Nawab Malik on MVA Government 2 years : दोन वर्षात सरकारने जनहिताची अनेक कामं केली : ABP Majha
Nawab Malik on MVA govt : राज्यात नव्या राजकीय समीकरणासह स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळाला दोन वर्ष पूर्ण झाली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षाच्या कारभाराबाबत जनता समाधानी असल्याचा दावा अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. राज्य सरकारने काटकसरीचे धोरण अवलंबले असल्याने सरकारच्या यशस्वी वाटचालीबाबत मोठा गाजावाजा करण्यात येणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर नवा प्रयोग करून आघाडी सरकार स्थापन झाले. राज्यातील जनतेला न्याय देणे, सगळ्यांना पुढे जाण्यासाठी काम करण्यावर सरकारने भर दिला. नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती निर्माण होऊनही राज्य सरकारने परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली.
दोन वर्षांत काम होऊनही काही जण सरकारविरोधात आरोप करत आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन तीन महिने पूर्ण होत नाही तोच कोविडचे संकट उभे ठाकले. महाराष्ट्राने या संकटावर यशस्वीपणे मात केली. सर्व कोविड रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी जागा मिळाली. रुग्णाला रुग्णालयात जागा मिळाली नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली नाही. त्याशिवाय राज्यात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली नाही, असेही मलिक यांनी म्हटले.
दरम्यान, भाजप आता हतबल झालंय,दोन वर्षांनंतरही सरकार पाडता आलं नाही, आमदार खरेदीचा कार्यक्रमही इथे करता आला नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. भाजपमधील नाराज नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी म्हटले. इतर पक्षांमधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांचीही पुन्हा एकदा घरवापसी सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.