Nawab Malik सत्य मांडतायत, सर्व प्रकरणांची चौकशी व्हावी, जयंत पाटलांकडून पाठराखण
दापोली : नवाब मलिक हे एनसीबीच्या विरोधात पुराव्यानिशी बोलत असून हे प्रकरण नागरिकांना छळण्यासाठी बदनाम करण्यासाठी व नागरिकांना अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यासाठी एनसीबीचा वापर होतोय असा गंभीर आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. जयंत पाटील यांनी म्हटलं की, गोसावी यांना अटक झाली कारण त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. त्यांचा बॉडिगार्ड प्रभाकर साईल याने ते आरोप केले आहेत. यामध्ये 25 कोटी रुपये वानखेडे यांनी मागितल्याचे तो बोलतो आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. केंद्रातून देखील एनसीबीची एक टीम आली आहे. ही टीम व्यवस्थित चौकशी करून नेमकं काय सत्य आहे हे समोर आणेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मागच्या काही दिवसांत पाहिलं असेल एनसीबीवर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले आहेत. विशेष करून बोगस कारवाई करून लोकांना त्रास दिला जात असल्याचं नवाब मलिक यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अशा आहे केंद्रीय टीम योग्य दिशेनं तपास करेल, असं पाटलांनी म्हटलंय.