Nandurbar stampede : धडगावमधील स्टेट बँकेत महिलांची चेंगराचेंगरी
Nandurbar stampede : धडगावमधील स्टेट बँकेत महिलांची चेंगराचेंगरी
नंदुरबारमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील धडगाव स्टेट बँक (State Bank) शाखेत महिलांची चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार घडला आहे. या चेंगराचेंगरीत दोन महिला बेशुद्ध पडल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ई केवायसीसाठी (E-KYC) बँकेत महिलांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. त्यावेळी हा प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव स्टेट बँक शाखेत ई केवायसीसाठी आदिवासी महिलांनी आज सकाळपासून बँकांसमोर तुफान गर्दी केली होती. भर पावसात बँकेसमोर एक ते दोन किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी महिलांची चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली.
चेंगराचेंगरीत दोन महिला बेशुद्ध
यात गर्दीमध्ये दोन महिलांची प्रकृती खराब झाल्याने त्या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच बँकेत महिला आणि पुरुषांची स्वतंत्र रांग नसल्याने अनेक महिलांसोबत छेडखानी झाल्याचाही माहिती मिळत आहे. मात्र छेडखानीसंदर्भात कोणत्याही महिलेने अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही.