MVA Lok Sabha Strategy : लोकसभेतील जागावाटपासाठी मविआचं काय ठरलं? जाणून घ्या
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातल्या संभाव्य उमेदवारांची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित झालं असल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केला असला तरी अजूनही त्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळं मविआच्या संभाव्य उमेदवारांची नावं तर अजूनही गुलदस्त्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मविआच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलावर येत्या दोन दिवसांत शिक्कामोर्तब होणार आहे. खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात या मविआच्या नेत्यांनी आज शरद पवारांची त्यांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. त्यांची शरद पवारांसोबतची बैठक साधारण एक-दीड तास चालली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट २० जागा लढवण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्ष १५ ते १८ आणि राष्ट्रवादीतला शरद पवार गट आठ ते दहा जागांवर उमेदवार देण्याची शक्यता आहे. मविआकडून वंचित बहुजन आघाडीला दोन आणि राजू शेट्टींच्या स्वाभिमानीला एक जागा सोडण्याची शक्यता आहे.