Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
मुंबई: दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर मुंबईत हाय अलर्ट (Alert Mode) जारी असतानाच, आज अंधेरीतील गुंदावली मेट्रो स्टेशनमध्ये एक संशयास्पद बेवारस बॅग आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
काय घडले नेमके?
आज दुपारी दोनच्या सुमारास गुंदावली मेट्रो स्टेशनच्या पहिल्या मजल्यावर एका काळ्या रंगाची बेवारस बॅग आढळून आली. स्टेशनवरील कर्मचाऱ्यांनी ही बॅग पाहिल्यानंतर तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
घातपाताचा संशय
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अत्यंत सतर्क आहेत. गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळलेल्या या बॅगमध्ये काही घातपात करण्यासाठी स्फोटक पदार्थ ठेवले असावेत, असा प्राथमिक संशय अंधेरी पोलिसांनी व्यक्त केला आहे. या गंभीर स्थितीमुळे अंधेरी पोलिसांनी कोणताही धोका न पत्करता त्वरित बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला (Bomb Detection and Disposal Squad - BDDS) पाचारण केले आहे.
BDDS पथकाची तपासणी सुरू
BDDS पथक सध्या या बेवारस बॅगची कसून तपासणी करत आहे. बॅगमध्ये नेमके काय आहे, हे BDDS पथकाच्या तपासणीनंतरच स्पष्ट होईल. जोपर्यंत तपासणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत गुंदावली मेट्रो स्टेशनमध्ये मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये धास्तीचे वातावरण पसरले आहे. सुरक्षा यंत्रणांनी स्टेशनच्या आसपासचा परिसर पूर्णपणे सील केला असून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.