Mumbai Mega Block ST Bus Service : लोकलला ब्रेक! मुंबईकरांच्या सेवेत गावच्या रस्त्यांवर धावणारी एसटी!
Central Railway Jumbo Mega Block : मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील फलाट क्रमांक 10 आणि11 च्या रुंदीकरणासह ठाणे (Thane) येथील फलाटांच्या कामासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मध्य रेल्वेकडून (Central Railway) मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉक कालावधीमध्ये 930 लोकल फेऱ्यांसह 72 मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकमुळे रेल्वेचं वेळापत्रक बदलल्यानं याचा थेट परिणाम नोकरदार वर्गावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर रेल्वेनं प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावं आणि गरज असल्यास रेल्वेनं प्रवास करावा, असं आवाहन केलं होतं.
कल्याण डोंबिवली परिसरातून दर दिवस लाखो प्रवासी, चाकरमानी मुंबईच्या दिशेनं प्रवास करतात. मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता होती. मात्र, रेल्वेच्या आवाहनाला प्रवाशांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं आहे. प्रवाशांनी देखील आज रेल्वे प्रवास टाळल्याचं दिसून येत आहे. आज कल्याणसह डोंबिवली रेल्वे स्थानकावर देखील नेहमीपेक्षा कमी गर्दी असल्याचं पाहायला मिळालं आहे.