Maratha Reservation Protest : सरकार जबाबदारी घेण्यास कमी पडणार नाही : सतेज पाटील
कोल्हापूर : "संभाजीराजे छत्रपती यांच्या मागण्यांबद्दल सरकार 100 टक्के सकारात्मक आहे. सरकार एक पाऊल पुढे यायला तयार आहे. सरकार आणि संभाजीराजे यांनी चर्चा करुन मार्ग काढूया. सरकार जबाबदारी घेण्यास कुठेही कमी पडणार नाही," असं आश्वासन कोल्हापूरचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिलं. मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात कोल्हापुरात मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या आंदोलनात आरक्षणाबाबत बोलताना सतेज पाटील यांनी हे आश्वासन दिलं.
कोल्हापुरातील या मूक मोर्चात राज्यभरातील मराठा समन्वयक सहभागी झाले आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही आंदोलनाला हजर आहेत. तसंच कोल्हापुरातील मूक मोर्चाला आमदार, खासदारांनीही उपस्थिती लावली आहे. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आपापलं मनोगत व्यक्त करताना मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच भूमिका मांडली.
सतेज पाटील म्हणाले की, "संभाजीराजे छत्रपती यांच्या मागण्यांबद्दल सरकार 100 टक्के सकारात्मक आहे. सरकार एक पाऊल पुढे यायला तयार आहे. पुन्हा एकदा भेटून चर्चा करणं गरजेचं आहे. सरकार उद्याच्या उद्या संभाजीराजे यांना वेळ द्यायला तयार आहेत. सरकार आणि संभाजीराजे यांनी चर्चा करुन मार्ग काढूया. हातात हात घालून आपण काम केलं पाहिजे. सरकार जबाबदारी घेण्यास कुठेही कमी पडणार नाही.