Maharashtra Lockdown : लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवण्याची सर्वच मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : राजेश टोपे
मुंबई : राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. त्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवलं जावं अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची मागणी सर्वच मंत्र्यांनी केली आहे. मात्र लॉकडाऊन बाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते बोलत होते.
तसेच राज्यात लसींचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 18 ते 44 वयोगटासाठीच्या लसीकरणाला तुर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्याची गरज आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना वेळेत दुसरा डोस न दिल्यात पहिला डोसचा प्रभाव होणार नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
मुंबईत ज्येष्ठ नागरिकाचं घरोघरी जाऊन लसीकरण, BMC लवकरच वॉर्डनिहाय लसीकरण कँप सुरु करणार
18 ते 44 वयोगटासाठी उपलब्ध असलेल्या लसी आता 45 वयापेक्षा जास्त वयोगटाच्या नागरिकांना देण्यात येणार आहेत. कोरोना लसीच्या उपलब्धतेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहेत, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.