Jan Ashirwad Yatra : 2014 पूर्वी भरकटलो होतो, फडणवीसांनी योग्य मार्ग दाखवला : मंत्री कपिल पाटील
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत केलेल्या कामाना आणि विशेषत: कोरोना काळात केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपकडून आजपासून देशभरात 'जन आशीर्वाद' यात्रा सुरु करण्यात आली आहे. या जन आशीर्वाद यात्रेत केंद्र सरकारचे 39 मंत्री हे देशभरातील 212 लोकसभा मतदारसंघांपर्यंत पोहोचणार आहेत. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांनीही आपल्या 'जन आशीर्वाद' यात्रेची सुरुवात केली आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या नेतृत्वाखाली पालघरमधून जन आशीर्वाद यात्रा सुरु झाली आहे. केंद्र सरकारची कामं लोकांपर्यंत पोहोचवणं आणि राज्यातील महाविकास आघाडीचे अपयश लोकांना सांगणे हा उद्देश या यात्रेमागे असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, "कोरोना काळात आम्ही कुठेही थांबलो नाही. मोदी शासनाने तळागाळातल्या लोकांसाठी काम केलं, सर्वांसाठी मोफत लसीकरण सुरु केलं. भारतात सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला असून याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातंय. उज्ज्वला सारख्या योजना असतील किंवा इतर योजना असतील, यापासून कुणीही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी ही जन आशीर्वाद यात्रा सुरु करण्यात आली आहे."