Marathi Language Row | CM Fadnavis यांचा 'ठाकरे बंधूंना' टोला, JNU मध्ये भाषा संवादाचं माध्यम!
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्यासन केंद्राचं भूमिपूजन आणि कुसुमाग्रज मराठी अध्ययन केंद्राचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी भाषा हे संवादाचं माध्यम आहे, विवादाचं नाही, असे स्पष्ट केले. मराठी शिक्षित पाहिजे, मात्र इतर भारतीय भाषांचा देखील मान ठेवला पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. त्यांनी 'ठाकरे बंधूंना' अप्रत्यक्षपणे सुनावलं. भाषा विवादाचं माध्यम होऊच शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले. भाषांवरून वाद घालणे किंवा मारामारी करणे सहन केले जाणार नाही, असेही फडणवीसांनी सांगितले. अशा घटनांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. कार्यक्रमावेळी JNU कॅम्पसमध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाने (SFI) आंदोलन केले. काही लोकांना शिवाजी महाराजांच्या नावाची अॅलर्जी आहे, पण कोणी कितीही विरोध केला तरी हा देश कायम शिवाजी महाराजांच्या नावानेच ओळखला जाईल, असे फडणवीस यांनी आंदोलकांना उद्देशून सांगितले. उद्योगमंत्री उदय सामंत आणि JNU विद्यापीठाच्या कुलगुरु शांतिश्री पंडित यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.