Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात आज मूक आंदोलन ; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

Continues below advertisement

कोल्हापूर : आजपासून म्हणजेच, 16 जूनपासून मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्त्वात मूक आंदोलन केलं जाणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली होती. 6 जून रोजी रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर संभाजीराजेंनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. येत्या 16 जूनपासून कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात होईल असं संभाजीराजे म्हणाले होते. आज सकाळी 1 वाजता शाहू महाराजांच्या समाधी स्थळी या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. 

आजपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मूक आंदोलनाची सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होणार असून आज कोल्हापुरातून या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी मौन बाळगून तसेच कोरोनाच्या नियमांचं पालन करुन हे आंदोलन करायचं आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा संसंर्ग वाढेल असं कोणतंही कृत्य करायचं नाही अशा सूचनाही आंदोलकांना देण्यात आलेल्या आहेत. 

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंनी दिलेल्या हाकेला प्रकाश आंबेडकर यांनी साद दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर कोल्हापुरातील मूक आंदोलनात सहभागी होणार आहेत. सकाळी 10 वाजता शाहू महाराजांच्या समाधी स्थळावरुन या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील अनेक नेतेही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटीलही या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकप्रतिनिधींना उलटसुलट न बोलण्याचं आवाहन संभाजीराजेंनी काल मराठा आंदोलकांना केलं आहे. 

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल (मंगळवारी) खासदार संभाजीराजे छत्रपती आढावा घेण्यासाठी कोल्हापुरात पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी उद्याच्या मूक आंदोलनात सहभागी होणाऱ्यांसोबत संवाद साधला. तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टींचा आढावाही घेतला. खासदार संभाजीराजे छत्रपती बोलताना म्हणाले होते की, "आपलं आंदोलन हे मूक आंदोलन आहे. अनेकांना वाटतं हा  मोर्चा आहे. पण मूक आंदोलनाचा अर्थच आहे. आपल्याला मूक मोर्चा काढायचा असता तर, आपण काढू शकलो असतो. पण मोर्चा काढण्याची ही परिस्थिती नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा लोकांना आपण वेठीस धरायचंय का? ज्या समाजाला आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत, त्यांनी आपल्या 58 मोर्चांच्या माध्यमातून केल्या आहेत. समाज बोलला आहे, आणखी त्यानं रस्त्यावर का उतरायचं? आतापर्यंत समाजानं आपली भूमिका मांडली आहे, त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनीही बोललं पाहिजे, अशी सर्वांची इच्छा आहे. आंदोलनासाठी सर्वच आमदार, खासदारांना आपण निमंत्रित केलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते सर्वजण येतील"

"आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपणही सन्मानपूर्वक वागणूक द्यायची. कारण ते आपल्यासाठी इथे येणार आहेत. आपल्यापैकी कोणीही त्यांना उलट-सुलट प्रश्न विचारायचे नाहीत. कोणीही बोलायचं नाही. माझ्यासह आपण सर्वांनी मौन राखायचं आहे. आंदोलनासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधींना बोलू द्यायचं, त्यांचं मन मोकळं करु द्या. हवं तेवढा वेळ बोलू द्यात. पण त्यांनी येणं महत्त्वाचं आहे. मला विश्वास आहे ते सर्वजण येतील.", असंही खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram