Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजे आज भूमिका जाहीर करणार
मराठा आरक्षण प्रश्नी राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती आज (28 मे) आपली भूमिका मांडणार आहेत. मुंबईत आज संध्याकाळी पाच वाजता संभाजीराजे छत्रपती आणि मराठा क्रांती मोर्चा यांची पत्रकार परिषद होणार आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आणि नेत्यांच्या भेटीनंतर संभाजीराजे आता नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे मराठा समाजासह सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांची भेट
तत्पूर्वी खासदार संभाजीराजे आज दुपारी 12 वाजता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर एक वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काय करता येईल यासंदर्भात ही भेट होणार आहे. याशिवाय संभाजीराजे बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेणार असल्याचं समजतं, परंतु भेटीची वेळ अद्याप निश्चित झालेली नाही.
शरद पवारांसोबतच्या बैठकीत काय झालं?
मराठा आरक्षण प्रश्नी संभाजीराजेंनी काल (27 मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे 13 मिनिटांच्या या भेटीत मराठा समाजाची अस्वस्थता शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवल्याचा दावा संभाजीराजेंनी केला. सोबतच आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याचं आवाहन पवारांना केल्याचं त्यांनी सांगितलं.