Manoj Jarange Patil :मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस,प्रकृती खालवल्यानं मध्यरात्री उपचार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजालना: मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या निकषात बसणारे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. मनोज जरांगे यांनी 8 जूनला आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. मंगळवारी सकाळपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आंतरवाली सराटीत (Antarwali Sarati) तैनात असणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती. मात्र,मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता. यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावल्यामुळे बुधवारी पहाटे अडीच वाजता मनोज जरांगे पाटील यांना उपचारासाठी आग्रह धरण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील आणि डॉक्टरांच्या टीमने मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढली. तेव्हा मनोज जरांगे उपचार घेण्यासाठी राजी झाले. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी तीन सलाईन लावण्यात आल्या.
अंबडचे जिल्हाधिकारी चंद्रकांत शेळके यांनी मंगळवारी दुपारी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना उपचार करुन घेण्याची विनंती केली होती. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीचे अपडेट्स सरकारला कळवले होते. राज्य सरकारकडून सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणावर लक्ष ठेवले जात आहे. अद्याप राज्य सरकारकडून कोणालाही मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करायला पाठवण्यात आलेले नाही. मात्र, आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रकृती वेगाने खालावत असल्याने राज्य सरकार त्यांच्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करणार का, हे पाहावे लागेल.