Maharashtra Unlock : दिवाळीपूर्वी निर्बंध आणखी शिथिल; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात...
मुंबई : यंदाची दिवाळी बऱ्याच अंशी निर्बंधमुक्त साजरी करता येणार आहे. कारण कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्यामुळे राज्य सरकारनं निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कोरोना टास्कफोर्ससोबत बैठक झाली यावेळी हॉटेल आणि दुकानांची वेळ मर्यादा वाढवण्याचा निर्णय झाला, 22 ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपट गृहं, नाट्यगृहांसोबत अम्यूझमेंट पार्कही सुरू होणार आहेत. तसंच दुकानांच्या वेळा वाढवून देण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले आहेत.
कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात आज टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील वॉटर पार्कशिवाय अन्य उपक्रमांना परवानगी देण्याचे ठरले. पार्क्स मधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्यात येईल. मुख्यमंत्र्याचं शासकिय निवासस्थान वर्षा येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या वेळी लहान मुलांच्या कोरोना टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते. अम्युझमेंट पार्क देखील 22 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत. तसेच कोविडव्यतिरिक्त डेंग्यू, चिकूनगुन्या यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ असून त्यांच्या उपचारांकडे देखील पुरेसे लक्ष द्यावे अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.