Special Report Teachers' Protest: आंदोलन मागे, पगाराचा चौथा टप्पा खात्यात, सत्ताधारी-विरोधक आरोप-प्रत्यारोप
आझाद मैदानावर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनाची सांगता झाली आहे. पगारासह अन्य मागण्या सरकारने मान्य केल्याने शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले. राज्यभरातील विनाअनुदानित शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारले होते. यामध्ये टप्प्याटप्प्याने शाळांना अनुदान देण्याचा २०२४ मध्येच घेतलेला निर्णय, प्रत्यक्ष निधी वितरणाची प्रतीक्षा आणि निरंगाई न होता वेळेत पगार मिळावा या प्रमुख मागण्या होत्या. सरकारने आंदोलनाची दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांना आंदोलकांची भेट घेण्यासाठी पाठवले. महाजनांनी आंदोलकांची भेट घेऊन शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री फडणवीसांशी आंदोलक शिक्षकांची सकारात्मक चर्चा झाली. "अधिवेशन संपण्यापूर्वी शिक्षकांना जो १४ ऑक्टोबरचा शासन आदेश दिला होता त्या शासन आदेशची तरतूद करुन पुढच्या महिन्याचा पगार अधिवेशन संपण्यापूर्वी त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असं आश्वासन केलेलं आहे," असे आश्वासन देण्यात आले. तसेच, येत्या आठ दिवसांमध्ये चौथ्या टप्प्याचा पगार शिक्षकांच्या खात्यात टाकला जाईल असेही जाहीर करण्यात आले. या आंदोलनाला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसह मवियाच्या नेत्यांनी पाठिंबा देत सरकारवर टीका केली. या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले. पुढची पिढी घडवणाऱ्या शिक्षकांवर अशी वेळ पुन्हा येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.