School Reopens : शाळा सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार
मुंबई : राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार होत्या. मात्र हा निर्णय आता तूर्तास लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशीरा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु करायच्या की नाहीत यावर काल राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला टास्क फोर्सचे सदस्य, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि काही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये लहान मुलांच्या आरोग्य संदर्भात आणि शाळा सुरू करायच्या की नाही यावर चर्चा झाली.
ज्या ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी शाळा सुरु राहतील, मात्र सरसकट शाळा सुरु करता येणार नाही असं तज्ञांनी मत व्यक्त केलं. त्यामुळे येत्या 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर पडलेला दिसतोय.
इतर राज्यात लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. लहान मुलांचे लसीकरण अथवा औषधेही उपलब्ध नसल्याने लगेच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेऊ नये असं टास्क फोर्सच्या तज्ञांनी सूचित केलं.