Satara Maharashtra Rains | सातारा जिल्ह्यात पूरस्थिती, 350 कुटुंब स्थलांतरित
सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. कोयना, कृष्णा आणि वेण्णा नद्यांना महापूर येण्याची शक्यता असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा, महाबळेश्वर, पाटण, वाई तालुक्यातील साडे तीनशेहून अधिक कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. वैभव बोर्डे यांनी सातारा जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. सातार्यातील संगम माहुली परिसरात नद्या दुथडी भरून वाहत आहेत. छत्रपती शाहू महाराजांची समाधी पूर्णतः पाण्याखाली गेली असून, फक्त कळस दिसत आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून, गावांचा संपर्क तुटला आहे. कराड-चिपळूण महामार्ग पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. पाटण तालुक्यातील हेळवाकजवळच्या गावातही अशीच परिस्थिती आहे. कोयना, धोम, बलकवडी, उमरोडी, तारळी धरणातून विसर्ग सुरू आहे. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे तेरा फुटाने उचलून ९३ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. कृष्णा आणि कोयना नदी दुथड्या भरून वाहत आहेत. कराडच्या प्रीती संगम परिसरातील कृष्णमाई मंदिरात पाणी शिरले आहे.