Maharashtra Rain Update : ऐन दिवाळीत राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी ABP Majha

Maharashtra Rain Update : ऐन दिवाळीत पावसानं राज्याच्या विविध भागात हजेरी लावली आहे. ठाणे, रायगड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नाशिकसह अनेक ठिकाणी काल पाऊस झाला. सिंधुदुर्गात सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलं. भातकापणी सुरू असताना झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. रायगडमध्येही उरण, पाली, सुधागड परिसरात पावसानं हजेरी लावली. विजांच्या गडगडाटासह इथं जोरदार पाऊस झाला. कोल्हापूरच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस झाला. चंदगड, नेसरी परिसरात झालेल्या पावसानं कापणी केलेल्या भाताचं नुकसान झालं. आठवडी बाजारातही पावसानं तारांबळ उडाली. 

नाशिकमध्येही पावसानं व्यावसायिकांची तारांबळ उडाली. कॉलेज रोड परिसरात आयोजित केलेला सांजपाडव्याचा कार्यक्रम पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे रसिकांचा हिरमोड झाला. राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात दोन दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.   

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. प्रामुख्याने उत्तर आणि दक्षिण गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुढील पाच दिवस मच्छिमारांना देखील समुद्रात न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola