Maharashtra Rain Special Report : गोदेला पूर; पाऊस नॉनस्टॉप, प्रमुख नद्यांच्या पातळीत वाढ
Maharashtra Rain Special Report : गोदेला पूर; पाऊस नॉनस्टॉप, प्रमुख नद्यांच्या पातळीत वाढ
गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाची (Nashik Rain Update) संततधार सुरु आहे. यामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर गंगापूर धरणातून (Gangapur Dam) विसर्ग सुरु असल्याने गोदावरीची पूरस्थिती (Godavari Flood) कायम आहे. गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गोदाकाठावरील मंदिर आजही पाण्याखाली आहेत. तर गोदामाईने नारोशंकराला जलाभिषेक घातला आहे. सलग तीन दिवसापासून पूर असल्याने गोदाकाठावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी पाऊस असल्याने 14 धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आज सकाळी गंगापूर धरणासह पालखेड, दारणा आणि नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सध्या गंगापूर धरण ८९.८४ इतके टक्के भरले असून धरणातून सकाळी 6 वाजता 8 हजार 428 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यानंतर सकाळी 9 वाजता हा विसर्ग 1204 क्यूसेकने कमी करून एकूण ७ हजार 224 क्यूसेकने सोडण्यात आले असून पावसाचा जोर कायम असल्यास टप्याटप्याने एकूण विसर्ग वाढवण्यात येणार आहे.
दुतोंड्या मारुतीच्या कुठपर्यंत पाणी?
या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गोदाकाठावरील छोटी-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.तसेच या सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नाशिक शहरात सलग तिसऱ्या दिवशीही पूर परिस्थिती कायम आहे. आज सकाळी दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी पोहचले होते. मात्र आता एक हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले आहे.
दादा भुसेंच्या प्रशासनाला सूचना
दरम्यान, नाशिक शहर व परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी होळकर पुलावर जाऊन पाणी पातळीचा आढावा घेतला. तसेच प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून नागरिकांनी सहकार्य करत खबरदारी घेण्याचे आवाहन मंत्री दादा भुसे यांनी केले.