Maratha Reservation आंदोलनात नक्षलवाद्यांची उडी, गडचिरोलीत पत्रक जारी
मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनात आता नक्षलवादी संघटनेने उडी घेतली आहे. "मराठा तरुणांनो दलालांपासून सावध राहा," या आशयाची पत्रकबाजी गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून केली जात आहे. "आमच्यामध्ये सामील व्हा," असं आवाहनही या पत्रकाच्या माध्यमातून नक्षलवाद्यांनी मराठा तरुणांना केलं आहे. हे सरकार केवळ अंबानी-अदानीचं आहे, त्यामुळे आरक्षण सोडून व्यवस्था बदलासाठी तयार राहा असं नक्षलवाद्यांनी म्हटलं आहे. यावर "मराठा समाजाचे एवढे वाईट दिवस आले आहेत का? नक्षली संघटना आम्हाला सांगते आम्ही कायद्यावरचा विश्वास सोडून त्यांच्यामध्ये सामील व्हावे. आम्हाला न्याय हक्क मिळवायचा आहे. आम्हाला कायद्यावर विश्वास आहे. वेळप्रसंगी आम्ही आंदोलन करु. न्यायालयीन लढाई लढून आणि आमचं आरक्षण किंवा पर्यायी व्यवस्था मिळवू," अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे.