Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Maharashtra Elections: नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 262 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 7.30 वाजता मतदानास सुरुवात झाली. सांयकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ होती. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय 23 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर आल्याने 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडले. नगरपालिका-नगरपंचायत मतदानाची वेळ संपली तरी देखील राज्यातील अनेक केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. तर अनेक ठिकाणी राडा झाल्याचे देखील दिसून आले. आता सर्वांचे लक्ष 21 डिसेंबरच्या निकालाकडे लागले आहे.
Muktainagar Election: मुक्ताईनगरात अपक्ष उमेदवारालाचे स्वतःचे मत हुकले
मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणुकीत अनोखी घटना घडली. अपक्ष उमेदवार ज्योती भालेराव यांना स्वतःच मतदानाचा हक्क बजावता आला नाही. संध्याकाळी ठरलेल्या साडेपाच वाजेच्या वेळेनंतर त्या मतदानासाठी केंद्रावर आल्या, मात्र वेळ संपल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. फक्त उमेदवारच नव्हे तर त्यांच्या बुथवरील कार्यकर्त्यालाही मतदान करता आले नाही, तसेच उशिरा पोहोचलेल्या काही मतदारांचीही मतदानाची संधी हुकली. उमेदवार स्वतः वेळेत मतदान केंद्रावर पोहोचू न शकल्याने स्थानिक पातळीवर आश्चर्य आणि चर्चांना उधाण आले आहे.
Mahad Shivsena Vs NCP Rada: महाडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये हाणामारी
महाड नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान नवे नगर परिसरात तणाव उसळला. दोन्ही गटांचे समर्थक आमनेसामने आले आणि तुफान हाणामारी झाली. प्राथमिक माहितीनुसार, सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला विकास गोगावले यांच्या समर्थकांनी मारहाण केली. जाबरे समर्थकांच्या अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली. ही बाचाबाची सुरु असताना सुशांत जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवल्याची माहिती आहे. त्यानंतर विकास गोगावले हेच रिव्हॉल्वर घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे महाडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा ताफा तैनात केल्याचे पाहायला मिळाले.