Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाचा निवडणुकांपूर्वी निर्णयांचा धडाका
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांची बिगुल पुढील आठवड्यात वाजण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आज महायुती सरकारच्या व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाची शेवटची बैठक आज संपन्न झाली. याबैठकीत जवळपास 80 निर्णय घेण्यात आले असून काही नव्याने महामंडळ स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामध्ये, संत गोरोबा कुंभार महामंडळ व कोळी समाज महामंडळाचा प्रस्ताव मागवण्यात आल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली. तसेच, मंत्रिमंडळाची आजची बैठक रेकॉर्ड ब्रेक झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्षकांचा विषय घेण्यात आला आहे, जो शिक्षणमंत्री सांगतील. त्यासोबतच, आजच्या कॅबिनेटमध्ये लेवा पाटील समाज महामंडळाला मंजुरी देण्यात आली आहे. पत्रकारांसाठी आणि वृतपत्र विक्रेते यांच्यासाठी दोन स्वतंत्र महामंडळासही कॅबिनेट बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. तर, ओबीसी नॉन क्रिमीलेयरचा उत्पन्न टप्पा 15 लाखांपर्यंत नेण्यात येत आहे, त्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून ते प्रसिद्ध पत्रक रद्द करण्यात आल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली. मात्र, आजच्या बैठकीत मराठा आरक्षणाचा विषय घेण्यात आला नव्हता, अशी देखील माहिती पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.