Kokan Roadway Update | रत्नागिरीत बस जळून खाक, चिपळूणमध्ये पूल कोसळला, जीवितहानी नाही
रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी बोगद्याजवळ मुंबईहून मालवणकडे जाणाऱ्या गणेश भक्तांच्या बसला मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक आग लागली. बसचा टायर फुटल्याने ही घटना घडल्याची माहिती आहे. चालकाच्या तत्परतेमुळे सर्व प्रवासी वेळेत बाहेर पडले, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले. खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. दुसरीकडे, चिपळूणमधील पिंपळी नदीवरील पूल कोसळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु चिपळूणहून दसपटीकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. यामुळे दहा ते पंधरा गावांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. हा पूल पन्नास वर्षांहून अधिक जुना होता. पुलाला तडा गेल्याची माहिती प्रशासनाला आधीच दिली होती, तरीही दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. "दोन हजार एकवीस च्या महापुरानंतर तेथे वारंवार मागणी करून या पुलाकडे दुर्लक्ष करण्यात आलं असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे." प्रशासनाचे अधिकारी पाहणीसाठी आले असतानाच त्यांच्या डोळ्यासमोर पूल नदीत कोसळला. खबरदारी म्हणून प्रशासनाने दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग केले आहे.