SSC and HSC board exam | दहावी, बारावी बोर्डाचे अंतिम वेळापत्रक जाहीर

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत होती. मात्र, राज्य मंडळाकडून 16 फेब्रुवारीला जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकावर मागवण्यात आलेल्या सूचनांनतर शुक्रवारी दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार असल्याचे राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे एप्रिल-मे 2021 मध्ये घेण्यात येणार्‍या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक 16 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आले होते. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या या संभाव्य वेळापत्रकावर संघटना, शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षणतज्ज्ञांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार आलेल्या सूचनांचे अवलोकन करून राज्य मंडळाने शुक्रवारी दहावी व बारावीचे संभाव्य वेळापत्रकच अंतिम केल्याचे जाहीर केले. त्यानुसार अंतिम वेळापत्रक राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी जाहीर केले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola