Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरुन वाद, सासू-सुनांचंच तू तू मैं मैं...प्रकरण काय?
लाडकी बहीण योजनेच्या सर्वेक्षणावरून अनेक घरांमध्ये वाद निर्माण झाले आहेत. योजनेच्या नियमानुसार एका घरातून केवळ दोन महिलांनाच निधी मिळणार असल्याने, तिसरे नाव वगळण्याचा प्रश्न सासू-सून यांच्यात संघर्षाचे कारण ठरला आहे. अंगणवाडी सेविकांकडून हे सर्वेक्षण केले जात असून, त्यांना या कौटुंबिक वादांमध्ये मध्यस्थी करावी लागत आहे, काही ठिकाणी पंचांची भूमिका बजावावी लागतेय. दोनपेक्षा जास्त लाडक्या बहिणींची नावे वगळण्याच्या नियमाला लाभार्थी महिला विरोध करत आहेत. "तुम्ही कोण आमचे नाव कपात करणार?" असा प्रश्न विचारत त्या अंगणवाडी सेविकांना माहिती देण्यास नकार देत आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी पैसे दिले असताना तुम्ही नाव कसे कमी करणार, असेही काही महिला विचारत आहेत. काही घरांमध्ये पती दारू पिऊन अंगणवाडी सेविकांना धमकावत आहेत, "तुम्ही कोण गावचे कलेक्टर आहात का?" असे प्रश्न विचारले जात आहेत. यामुळे अंगणवाडी सेविकांना सर्वेक्षण करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.