Kolhapur Flood | आंबेवाडी, प्रयाग चिखलीत पाणी; नागरिक स्थलांतरित नाहीत!
कोल्हापूर जिल्ह्यात महापूर सर्वप्रथम आंबेवाडी आणि प्रयाग चिखली या दोन गावांमध्ये येतो. सध्या या गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. अनेक घरांच्या उंबरठ्याला पाणी लागले आहे. मात्र, अद्याप येथील नागरिक स्थलांतरित झालेले नाहीत. आंबेवाडीमधील महिलांनी त्यांच्या समस्या मांडल्या. "सरकारनं आमची काही सोय केलेली नाही, काही नाही," असे महिलांनी सांगितले. दरवर्षी पाणी येते आणि त्रास होतो, तरी सरकारकडून कोणतीही ठोस व्यवस्था केली जात नाही, अशी त्यांची तक्रार आहे. लहान मुले आणि नवजात बालके घेऊन कुठे जायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निवारा केंद्रांची सोय असूनही, दरवर्षीच्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सरकारने यावर त्वरित निर्णय द्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.