Khashaba Jadhav : खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याची मागणि दिल्लीदरबारी
ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताला पहिलं वैयक्तिक पदक जिंकून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळवून देण्याच्या महाराष्ट्राच्या लढ्याला यंदा यश येण्याची चिन्हं दिसत आहेत. खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजीत आणि पैलवान संग्राम कांबळे हे सध्या दिल्ली मुक्कामी आहेत. खाशाबांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा म्हणून सुरु असलेल्या पाठपुराव्याला केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी पाठबळ दिल्याचं रणजीत जाधव यांनी एबीपी माझाला सांगितलं. जाधव आणि कांबळे यांनी रिजिजू यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. खाशाबा जाधव यांनी 1952 सालच्या ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या कांस्यपदकावर रिजिजू यांनी आदरानं आपला माथा टेकवला. त्यांनी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी दूरध्वनीवरून बातचीत करून खाशाबांचा प्रस्ताव लावून धरण्याची सूचना केली. तसंच खाशाबांसाठी पंतप्रधान कार्यालयाशी बोलण्याचं आश्वासन रिजिजू यांनी रणजीत जाधव यांना दिलं आहे.