World Air Quality Report : जगातील १०० सर्वाधिक प्रदूषित ठिकाणांपैकी ६३ शहरं भारतातील : ABP Majha
World Air Quality Report : जगातील १०० सर्वाधिक प्रदूषित ठिकाणांपैकी ६३ शहरं भारतातील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्विस फर्म IQ एअरनं जाहीर केलेल्या वर्ल्ड एअर क्वॉलिटी अहवालातून ही माहिती समोर आली आहे. यातील निम्म्याहून अधिक शहरं हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील असल्याचं समोर आलं आहे. तर, राजधानी दिल्ली ही सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वात प्रदूषित राजधानी ठरली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दिल्लीतील प्रदूषणात सुमारे 15 टक्क्यांनी वाढ झाल्याचं या अहवलात नमूद करण्यात आलं आहे. वायू प्रदूषणाच्या प्रमुख स्त्रोतांमध्ये वाहनांमधून निघणारा धूर, कोळशावर चालणारे ऊर्जा प्रकल्प, औद्योगिक कचरा, स्वयंपाकासाठी केलं जाणारं ज्वलन आणि बांधकाम क्षेत्र यांचा समावेश आहे. या वाढलेल्या प्रदुषणामुळे नागरिकांमध्ये श्वसनाचे विकार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.