Hingoli | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावरून शिवसेना-पडळकर आमनेसामने

Continues below advertisement

हिंगोली : जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून शिवसेना आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्ह आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या पुतळ्याचे अनावरण हे येत्या 16 मार्चला करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर लगेच शिवसेना आमदार संतोष बांगर यांनीही 11 मार्चला अनावरण करणार असल्याचे जाहीर केले आहे. 

हिंगोलीतील औंढा नागनाथ येथे अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. मात्र, या पुतळ्याचे अनावरण रखडले होते, यानंतर एक जानेवारी रोजी धनगर समाज नेते तथा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या ठिकाणी भेट देऊन येत्या पंधरा दिवसात जर या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले नाही तर आम्ही समस्त मेंढपाळांना घेऊन या पुतळ्याचे अनावरण करू असे जाहीर केले होते. यानंतर शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी कोरोनामुळे मुख्यमंत्र्यांना येता आले नसल्याने हे रखडल्याचे सांगितले होते. मात्र, पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांनी आज आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ व पत्रिका पोस्ट केली ज्यात श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती 16 मार्चला असून या जयंतीदिनी मी या पुतळ्याचं अनावरण मेंढपाळ बांधव भगिनी यांच्या हस्ते करणार असल्याचे जाहीर केले. त्यावर लगेच शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी या पुतळ्याचे अनावरण कोरोना असल्यामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत 11 मार्च रोजी करणार असल्याचे जाहीर केल्याने आता नेमकं कोण या पुतळ्याचे अनावरण करणार असा प्रश्न निर्माण झालाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram