Hatharas Santsang Bholebaba Reaciton : जे घडणार आहे ते कसं टाळता येईल, भोलेबाबाची प्रतिक्रिया
हाथरस येथे स्वयंघोषित धर्मगुरू नारायण साकार उर्फ भोले बाबा उर्फ सूरज पाल सिंह जाटव यांच्या सत्संगाच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत १२३ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर देशभरातून आयोजक आणि भोले बाबांविरोधात संतापाची लाट उसळली असतानाच नारायण साकार यांनी एक असंवेदनशील वक्तव्य केलं आहे. नारायण साकार म्हणाले, “ही दुर्घटना घडल्यापासून मी खूप चिंतेत आहे. परंतु, जे घडणार आहे, ते कसं टाळता येईल. ज्याने या जगात, या भूमीवर जन्म घेतलाय त्याला एक दिवस जायचंच आहे. भले त्याच्या मागे कोणी असो अथवा नसो. प्रत्येकाला परत फिरायचं आहे.” नारायण साकार यांनी त्यांचे वकील एस. पी. सिंह यांचा विषारी वायूसंदर्भातील दावा खरा असल्याचं म्हटलं आहे. सिंह यांनी दावा केला होता की “सत्संगाच्या कार्यक्रमात कोणीतरी विषारी पदार्थ अथवा वायू फवारला होता. त्यामुळेच ही चेंगराचेंगरी झाली आणि अनेक भक्त मृत्यूमुखी पडले.” नारायण साकार या दाव्याला दुजोरा देत म्हणाले, “सत्संगात कोणीतरी विषारी वायू फवारल्याची बाब खरी आहे. कोणीतरी आमच्याविरोधात कट रचला आहे. काहीजण आम्हाला बदनाम करू पाहत आहेत. परंतु, माझा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीवर पूर्ण विश्वास आहे.