Anil Deshmukh case| परमबीर सिंह यांच्यावर पत्र देण्यासाठी कुणाचा दबाव?: हसन मुश्रीफ Hasan Mushrif PC

Continues below advertisement

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षही सातत्यानं महाविकास आघाडी सरकार आणि अनिल देशमुख यांच्यावर टीका करत होते. काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांच्या मालमत्तेवर सीबीआयनं छापेमारीही केली होती. यासर्व घडामोडींवर बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. परमबीर सिंह यांच्यावर पत्र लिहिण्यासाठी नेमका कुणाचा दबाव होता? तसेच एका आरोपीच्या पत्रावरुन पुढची दिशा ठरू शकत नाही, असं अनिल देशमुख प्रकरणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. 

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलताना सांगितलं की, "अनिल देशमुखांना अटक होणार नाही. कारण पुरावेच नाही. एखाद्या आरोपीचं पत्र हे काय पुरावा होऊ शकत नाही. पत्र कसं दिलेलं आहे? पत्र देण्यामागे उद्देश काय? त्यामागे दबाव कुणाचा? तसेच यामागील कटकारस्थान काय, हे सांगतोय आम्ही." पुढे बोलताना, सामनामधल्या मारुती कांबळेचं झालं काय?, हे सांगा आम्हाला, असं म्हणत त्यांनी टोलाही लगावला. 

"एनआयएकडे तपास देऊन महिना होऊन गेला, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आलाय. त्याचा अजून शोध लागलेला नाही, हत्या की, आत्महत्या हे देखील समजलेलं नाही. फक्त राजकारण करायचं, एखाद्या पक्षाला बदनाम करायचं, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करायचा, यासाठी भारतीय जनता पक्षाची ही खेळी आहे.", असं ते म्हणाले. 

हसन मुश्रीफ म्हणाले की, "मुंबई पोलिसांची कामगिरी चांगली आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा छडा का लागला नाही अजून? एनआयएनं अद्याप तपास का नाही केला? एसआयटीनं आमच्या तपास पूर्ण केला होता. मूळ आरोपीपर्यंत ते पोहोचले होतो. अशातच दोन दिवसांत त्यांच्याकडून तपास काढून घेतला, याचं कारण काय? मला असं वाटतं की, कोणताही पुरावा नाही. माफिचा साक्षीदार करण्यासाठी परमबीर सिंहांकडून पत्र घेण्यात आलं. त्यानंतर याप्रकरणी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावण्या, आम्ही कोणत्याही न्यायालयाचा अपमान केला नाही. न्यायालयाला सर्वश्रेष्ठ आम्ही मानत आलेलो आहोत. ही भाजपची खेळी आहे. त्याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. सातत्यानं करतोय."

पुढे बोलताना हसन मुश्रीफ यांनी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं कुणी ठेवली? का ठेवली? त्याचा उद्देश काय? त्यामागील मास्टरमाइंड कोण? असे प्रश्नही उपस्थित केले आहेत. तसेच एसआयटीनं तपास केला असता तर या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असता आणि आरोपी जेलमध्ये गेले असते, असा विश्वासही हसन मुश्रीफ यांनी केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram