BE Positive : दिव्यांग तरुण-तरुणींचा पर्यावरणस्नेही राखी निर्मीतीचा उपक्रम,महिनाभरात 1 लाखाची उलाढाल
चंद्रपूर शहरात 15 दिव्यांग युवक-युवतींनी एकत्र येत पर्यावरणस्नेही राखी निर्मितीचा प्रकल्प सुरू केलाय. गेले दीड वर्ष रोजगार निर्मितीचा मोठा प्रश्न आहे. त्यातही दिव्यांग बांधव रोजगार नसल्याने मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत. राखीचा सण पुढ्यात असल्यामुळे चंद्रपुरात दिव्यांग सहकार्य संस्थेने पर्यावरणस्नेही राखी निर्मितीचा प्रकल्प उभा केलाय. बांबूपासून राखी निर्मितीच्या या प्रकल्पाने दिव्यांग व्यक्तींना रोजगारासह प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे.
चंद्रपूर शहरातील बाबुपेठ भागात दिव्यांग सहकार्य संस्थेने गेले महिनाभर सुमारे 15 महिला-पुरुष दिव्यांग बांधवांना सोबत घेत बांबू राखी निर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे. विशेष म्हणजे या राखी विक्री करण्यासाठीही दिव्यांगांचीच मदत घेतली जात आहे. दिव्यांग व्यक्तींना कोरोना काळानंतर भक्कम मदतीचा हात देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प उभा करण्यात आलाय. कच्चामाल व प्रत्यक्ष तयार राखी अशी मिळून महिनाभरात दिव्यांग बांधवांनी एक लाख रुपयांची उलाढाल केली आहे.