Ganesh Visarjan | पुण्यात ३२ तास मिरवणूक, राज्यभरात १५ जणांचा मृत्यू

पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुका अखेर बत्तीस तासानंतर पार पडल्या. गेल्या वर्षीचा तीस तासांचा विक्रम यावर्षी मोडीत निघाला. यंदा तब्बल बत्तीस तास लागले. कमी वेळेत मिरवणूक पार पाडण्याचे पुणे पोलिसांचे प्रयत्न निकामी ठरले. पोलिसांचे सूक्ष्म नियोजनही फसले. दोन मंडळांमधील लांबलेले अंतर आणि रेंगाळलेल्या मिरवणुका यामुळे पोलिसांचे वेळापत्रक कोलमडले. २०१६ ते २०१९ दरम्यान साधारणपणे अठ्ठावीस तास पंधरा मिनिटे मिरवणूक सुरू होती. दोन हजार बावीस साली एकतीस तास तर दोन हजार चोवीस साली तीस तास लागले होते. दोन हजार पंचवीस साली बत्तीस तास मिरवणूक सुरू होती. राज्यभरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले. राज्यभरात पंधरा जणांचा मृत्यू झाला. पुण्यात चाकण परिसरात विविध घटनांमध्ये चौघांचा बुडून मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यात तीन घटनांमध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमध्ये तीन जण वाहून गेले, ते अजूनही बेपत्ता आहेत. नांदेडच्या गाडेगावमध्ये आसना नदीत तिघेजण पडले होते, ज्यातील एकजण वाचला तर दोघांचा शोध सुरू आहे. मुंबईतील ट्रॉलीला विजेचा धक्का लागला, ज्यात एकाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. अकोल्यातल्या रस्ता अपघातात एका गणेश भक्ताचा मृत्यू झाला आणि तिघे गंभीर जखमी झाले. जळगावमध्ये गिरणा नदीत एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली. नाशिकमध्ये दोन घटनांमध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola