Sangli Corona : सांगलीत महिला रुग्णाला टेम्पोतून आणण्याची वेळ, रुग्णवाहिकेअभावी कोरोना रुग्णांचे हाल
सांगलीतील ग्रामीण भागातील एका महिला कोरोना रुग्णाला तीन चाकी टेम्पोमधून सांगलीत आणण्याची आणि त्या गाडी मधूनच हॉस्पिटल शोधण्याची वेळ आलीय. टेम्पोच्या मागील बाजूस ऑक्सिजन सिलेंडर बांधून रुग्णाला त्याच्या नातेवाईकांनी आणले. सिलेंडर मधील ऑक्सिजन संपत आल्याने रुग्णाच्या नातेवाईकांची रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी यावेळी धावपळ उडाली. मात्र त्यांना कुठेच बेड उपलब्ध होत नव्हता. अखेर नातेवाईकांनी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालय समोर ती गाडी आणून लावली आणि बेड उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी आमदार गाडगीळ यांनी त्या रुग्णास एका रुग्णालयात बेड उपलब्ध करून दिला. त्यामुळे सांगलीत कोरोना रुग्णास त्याची परिस्थिती बिघडत असताना देखील ओळखीशिवाय बेड मिळत नसल्याची परिस्थिती आहे. या घटनेने सांगली मधील कोरोना स्थितीचे आणि हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य लोकांना बेड मिळत नसल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.