Sambhajinagar Bondu Baba : काठीने चोप ते लघुशंका पाजणे; भूत उतरवणाऱ्या भोंदूबाबाचा भांडाफोड
महाराष्ट्राला लागलेली अंधश्रद्धेची कीड कधी दूर होणार, हा प्रश्न छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर गावातील एका घटनेमुळे पुन्हा उपस्थित झाला आहे. मूल होत नाही, लग्न होत नाही, दारू सोडत नाही, अंगात भूतबाधा झाली आहे अशा समस्या घेऊन आलेल्या नागरिकांवर संजय रंगनाथ पगार नावाचा बोंदूबाबा अघोरी कृत्य करत होता. तो लोकांना काठीने मारहाण करायचा, स्वतःचा बूट तोंडात धरायला लावायचा आणि लघुशंका प्यायला द्यायचा. महिलांनाही नको त्या ठिकाणी स्पर्श करत असल्याचा आरोप आहे. अंनिसला (महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती) या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच बोंदूबाबा भक्तांसह फरार झाला. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. यापूर्वीही एका महिलेने या बाबाविरोधात तक्रार दिली होती, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप तिने केला आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, "मी तक्रार पोलीस स्टेशनला केली होती आणि मी ग्रामसभेत पण विषय घेतला होता. मी दोन तीन वेळा गेले पण सर् त्यांनी माझं काही मनावरच घेतलंय नाही तर त्यांच्याकडून हस्ते भेटत होते." संजय पगार, वय ४८ ते ५० वर्षे, शिऊर गावचा रहिवासी आहे. लग्नाच्या वरातीत घोडे पुरवण्याचा त्याचा व्यवसाय होता. गेल्या काही वर्षांपासून तो बिरोबा मंदिरात दरबार भरवून रविवारी आणि गुरुवारी असे अघोरी प्रकार करत होता. एबीपी माझा अशा बुआ बाबांच्या नादी न लागता डॉक्टरांकडे उपचार घेण्याचे आवाहन करत आहे.