EXCLUSIVE : राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर आलाय, काल झालेला हल्ला हा बहुजनांवरील होता : गोपीचंद पडळकर
मुंबई : "राष्ट्रवादी आता मुद्द्यांवरुन गुद्द्यांवर आली आहे," असं भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल गाडीवर झालेल्या दगडफेकीवर म्हटलं आहे. "राष्ट्रवादीचा खरा चेहरा आता समोर आला आहे," अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. काल झालेला हल्ला हा बहुजनांवरील होता असंही ते म्हणाले. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी शरद पवारांवरील आपल्या टीकेचं समर्थन करताना राष्ट्रवादीवर हल्ला केला.
सोलापुरात काल (30 जून) गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणारा तरुण मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या हल्ल्यात गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची काच फुटली आहे. सोलापुरातील मड्डी वस्ती इथे हा प्रकार घडला आहे. गोपीचंद पडळकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यानंतर हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, "राष्ट्रवादीने पूर्वनियोजित पद्धतीने माझ्यावर हल्ला केला. दगडफेक करणाऱ्याने शरद पवारांच्या नावाने घोषणा दिल्या. तो शरद पवारांचा जवळचा कार्यकर्ता होता, असा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला. मी खालच्या भाषेत टीका करत नाही, मी माझी भूमिका स्वच्छ आणि स्पष्टपणे मांडतो. कोणाला ही खालच्या भाषेतील टीका वाटत असेल तर मला फिकीर नाही. मी शिव्या देत नाही, मी फक्त मुद्द्यांवर बोलतो, राष्ट्रवादीने मुद्द्यावर बोलावं. राष्ट्रवादी गुद्द्यावर येतेय, आज दगड घालत आहेत. राष्ट्रवादीचा दादागिरीचा, मवालीगिरीचा चेहरा समोर आला आहे." तसंच "पुरोगामीत्वाचा बुरखा कुठे गेला?" असा सवाल पडळकर यांनी विचारला.