Environment day : पिंपरी चिंचवडमधील दृष्टीहिनांनी बाळगलं हरित भारताचं स्वप्न, करत आहेत भन्नाट काम
नकारात्मक वातावरणातील एक सकारात्मक बातमी. पिंपरी चिंचवडमधील दृष्टीहीनांनी हरित भारताचं दृष्टिकोन त्यांच्या डोळ्यासमोर ठेवलंय. ऐन लॉकडाऊनमध्ये त्यांचे हात यासाठीच झटतायेत. पर्यावरणाचं रक्षण राखतानाच त्यांच्या रोजगाराचा ही प्रश्न यानिमित्ताने मिटलाय. पाहुयात पर्यावरण दिनानिमित्त एक पॉझिटिव्ह बातमी.
दुसऱ्या लाटेत कोरोनाने ऑक्सिजन अभावी मनुष्याचा जीव कसा टांगणीला लागतो, हे प्रत्येकाला दाखवून दिलं. म्हणूनच भविष्यात अशी वेळ पुन्हा येऊ नये, असा दृष्टिकोन या दृष्टिहीनांनी त्यांच्या डोळ्यासमोर ठेवलाय. त्यासाठीच गेल्या तीन महिन्यांपासून हे हात सिड बॉलची निर्मिती करण्यासाठी झटतायेत.
माती, कोळसा, शेणखत आणि सेंद्रिय खत यांचं मिश्रण करून चिखल तयार केलं जातं. त्यात यातील एक बी घेऊन चिखलाचा गोळा तयार केला जातो. हाच गोळा शेणाच्या गवऱ्यांपासून बनविलेल्या भुश्यात टाकला आणि अशाप्रकारे सीड बॉलची निर्मिती होते. हे अंधबांधव विविध अठरा जातीच्या बियांपासून असे सीड बॉल बनवितायेत. त्यांचं एकच ध्येय आणि उद्धिष्ट आहे. ते म्हणजे हरित भारताचं. हेच हरित भारताचं उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेऊन इथं आत्तापर्यंत अडीच लाख सीड बॉलची निर्मिती झालीये.
लॉकडाऊनमुळं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील दृष्टिहीनांवर बेरोजगारीची वेळ आली. अशात आस्था हॅंडी क्राफ्ट्स ही संस्था मात्र त्यांच्यासाठी धाऊन आली.
सिमेंटची जंगलं उभारायच्या नादात हल्ली सर्रास वृक्षतोड केली जाते. याच बेजबाबदारपणामुळं अनेक कोरोना रुग्णांना मोठी किंमत मोजावी लागली. आता ही वेळ पुन्हा येऊ द्यायची नसेल तर या दृष्टिहिनांच्या स्वप्नाला आपण बळ देऊ. चला तर मग हे सिड बॉल खरेदी करु आणि मातीत ते रुजवू.