Eknath Shinde Maharashtra : शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर
Eknath Shinde Maharashtra : शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या भव्यदिव्य यशानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण, याची चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापैकी कोण मुख्यमंत्री होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपने (BJP) एकहाती 132 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, असा आग्रह भाजप समर्थकांनी धरला होता. मात्र, एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्रिपदावर (Maharashtra CM) दावा ठोकल्याची चर्चा होती. शिंदे गटाच्या नेत्यांकडून तशाप्रकारची विधाने केली जात होती. मात्र, दिल्लीतील भाजप नेतृत्त्वाने एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा स्पष्ट संदेश दिल्याची माहिती आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून आपल्या मुख्यमंत्रिपदासाठी वेगवेगळ्या स्तरावर वातावरणनिर्मिती करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी एक पाऊल मागे घेतल्याचे सांगितले जात आहे.
महायुतीच्या यशात एकनाथ शिंदे यांचे कशाप्रकारे योगदान आहे, ते कशाप्रकारे लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, या गोष्टी शिंदे समर्थकांकडून भाजपश्रेष्ठींच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न सुरु होता. राज्यातील काही संघटनांकडून देवळांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी अभिषेक आणि प्रार्थना करण्यात आल्या होत्या. याशिवाय, सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेचे गोडवे गाणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. महायुतीच्या यशात आपलेही योगदान आहे. त्यामुळे किमान अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आपल्याकडे राहावे, असा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न होता. मात्र, भाजप नेतृत्वाकडून पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळणार नाही, हे स्पष्ट केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शर्यतीतून माघार घेतल्याचे सांगितले जाते.