Droupadi Murmu Victory : द्रौपदी मुर्मू यांचा विजय, राष्ट्रपतीपदावर पहिली आदिवासी महिला विराजमान
नवी दिल्ली: संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. द्रौपदी मुर्मू यांना 812 मतं तर यशवंत सिन्हा यांना 521 मतं मिळाली आहेत.
राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला असतील. द्रौपदी मुर्मू या 24 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. देशाचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल 24 जुलै रोजी समाप्त होणार आहे.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना 540 मतं मिळाली होती. या मताचे मूल्य 3,78,000 इतकं होतं. तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना 208 मतं मिळाली होती, त्यांच्या मताचे मूल्य हे 1,45,600 इतकं होतं. दुसऱ्या फेरीत द्रौपदी मुर्मू यांना 1349 मतं मिळाली तर यशवंत सिन्हा यांना 537 मतं मिळाली. सर्व राज्यांतील मतमोजणी झाल्यानंतर अखेर मुर्मू यांना 5 लाख 77 हजार 777 इतकी मतं मिळाली.
विशेष म्हणजे 15 वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे 21 जुलै रोजी देशाला प्रतिभा पाटील यांच्या रुपाने पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. 21 जुलै 2007 रोजी झालेल्या मतमोजणीत प्रतिभा पाटील यांचा विजय झाला होता. त्यांनी 25 जुलै 2007 रोजी पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्या देशाच्या 12 व्या राष्ट्रपती होत्या. 2007 ते 2012 या कालावधीत त्यांनी देशाचं सर्वोच्च पद भूषवलं. त्यानंतर आता द्रौपदी मुर्मू यांनी निवडणुकीत बाजी मारली आहे.