
Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नव्यानं NIA मार्फत चौकशी करण्याची मागणी
मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत वडील सतीश सालियन यांची हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केली आहे. तसेच या प्रकरणात एनआयए चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणी आता लवकरच सुनावणी अपेक्षित आहे.
या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्याची मागणी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी याचिकेच्या माध्यमातून केली आहे. मुंबई पोलिस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकल्याचा दावा दिशाच्या वडिलांचा केला आहे. त्यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोपही या याचिकेतून करण्यात आला आहे.
मुंबई पोलिस आणि आदित्य ठाकरेंवर आरोप
दिशा सालियानच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेतून आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोर्या यांच्यासह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे तसेच पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपांत तथ्य असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा कोणताही संबंध नसल्याचा दावा या आधी तिच्या कुटुंबीयांनी केला होता. आता दिशाच्या वडिलांनी नव्याने याचिका दाखल केली आहे.