WEB EXCLUSIVE | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा कशा असणार?
सोलापूरसह राज्यभरातील काही शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे सोलापुरातील महाविद्यालये 7 मार्च पर्यंत ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र यंदाच्या वर्षी ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा होणार या बाबत संभ्रमावस्था कायम आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून 7 मार्च नंतर निर्णय घेतला जाईल अशी माहिती प्रभारी परीक्षा संचालक श्रेणीक शाह यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलपूर विद्यापीठातील जवळपास 35 हजार विद्यार्थ्यांची परीक्षा मार्च अखेर आणि एप्रिलच्या सुरुवातीला होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर परीक्षा ऑनलाईन घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही मात्र परिस्थिती नियंत्रणात असेल तर ऑफलाइन परीक्षा घेण्यातही कोणतीही अडचण येणार नाही अशी माहिती परीक्षा संचालकांनी दिली. विद्यापीठाने ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तयारी केली आहे. तसेच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या द्वितीय आणि तृतीय वर्षातील काही परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. मात्र मार्च अखेरपर्यंत त्यांचे देखील जाहीर होतील अशी माहिती देखील यावेळी प्रभारी परीक्षा संचालकांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.