फळबागांचं मोठं नुकसान,पंचनामे करुन नियमानुसार मदत देणारच, पण अतिरिक्त मदतीबाबत विचार करु : अजित पवार
"तोक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे, पण गुजरात इथे जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. सकाळी आढावा घेतला असून आज दुपारी आपत्कालीन विभागाची बैठक देखील आहे. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही दुपारी साडेतीन वाजता बैठक घेणार आहेत," असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. "फळबागांचं नुकसान मोठं झालं असून त्यांचे पंचनामे करायला सांगितले आहेत. नियमानुसार मदत केली जाईलच पण अतिरिक्त मदत करण्याबाबत विचार करु," असंही ते म्हणाले. "SDRF कडून मदत मिळते पण कधी मुख्यमंत्री आऊट ऑफ द वे जाऊन मदत करु शकतात. कोकणात वीज पुरवठा खंडित झाला आहे, तिथला वीज पुरवठा पूर्ववत करणं गरजेचं आहे. त्यानुसार लवकर काम करावं लागेल. बाहेरुन टीम पाठवून काम करावं लागेल. एका बोटींचे काही नाविक गायब आहेत त्याचाही तपास सुरु आहे," असं अजित पवार यांनी सागितलं. दरम्यान "पीककर्ज तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याजाने देणार आहोत. पीककर्जात अडथळा आणू नये अशा सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारने खतांचे दर कमी केले नाही तर राष्ट्रवादी याबाबत आंदोलन करणार आहे," अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.