Cyclone Tauktae:घराचे पत्रे कोसळत होते,तेवढ्यात नातवाला खेचलं म्हणून...;सुपरहिरो ठरलेले आजोबा माझावर

Continues below advertisement

रत्नागिरी : 'संध्याकाळी पाच वाजताची वेळ होती. वारा जोरात होता. आम्ही सर्व घरातच होतो. पावसामुळे बाहेर जाणं आम्ही टाळलं. माझा पाच वर्षाचा नातू वेदांत खेळत होता. काही वेळाने मी देवाची बत्ती करण्याकरता देवघरात गेलो. तोच बाहेरुन धडाम असा आवाज आला. घरासमोरील मोठं झाड कोसळून आमच्या घरावर पडलं होतं. घराचे पत्रे फुटत होते. माझे डोळे वेदांतला शोधत होते. तोच वेदांत माझ्या नजरेला पडला. वरुन पत्रे कोसळत होते. वेदांत पत्रे कोसळत असलेल्या खोलीकडे जात होता. मी त्याला क्षणाचाही विलंब न लावता मागे खेचलं आणि त्याला पोटाखाली घेतलं. माझ्या पाठीवर पत्रे पडले. मला मार लागला पण, माझा नातू सुखरुप असल्याचं समाधान होतं. जर मी माझ्या नातवाला खेचलं नसतं तर कोण जाणे काय झालं असतं. आम्हाला या प्रसंगाची कल्पना देखील करवत नाही. क्षणातं होत्याचं नव्हतं झालं. सारा संसार वादळाने हिरावला. आता आम्ही शेजाऱ्यांकडे राहतोय. लाखोंचा खर्च आता आम्हाला करायला लागणार आहे. पण, समाधान एकच आमचा नातून सुखरुप आहे.' हे शब्द, हा अनुभव आहे 70 वर्षांच्या अशोक कलंबटे यांचा. हे सारं सांगताना अशोक यांचा आवाज घोगरा तर डोळे पाणवले होते. श्वास फुलला होता. 'एबीपी माझा'शी बोलताना अशोक कलंबटे आपल्या नातवाकडे समाधानाने पाहत हा सारा प्रसंग कथन करत होते. 

तोक्ते चक्रीवादळात कोकणातील अनेक घरांचं नुकसान झालं. तर, काहींवर बाका प्रसंग ओढावला. त्यापैकी एक म्हणजे रत्नागिरी तालुक्यातील कर्ले गावातील कलंबटे कुटुंबिय. 'तोक्ते'ने सारं काही नेलं. सुदैवाने घरातील सर्व सदस्य सुखरुप आहेत. 

यावेळी आम्ही वेदांतशी देखील बोललो. पाच वर्षीय वेदांतशी देखील आम्ही बोललो. त्यावेळी आपल्या बोबड्या बोलाने वेदांत सांगू लागला. "मी देवाच्या खोलीत जात होतो. धडाम आवाज आला. मी खिडकीतून बाहेर पाहिलं तर झाड घरावर कोसळले होते. वरुन घराचे पत्रे देखील कोसळत होते. तेवढ्यात आजोबांनी मला जोराने ओढत आपल्या पोटाखाली घेतलं. आजोबांच्या पाठीला लागलं. आजीच्या डोक्याला टाके पडले आणि माझ्या हाताला काहीसा मार लागला," असं सांगताना वेदांत आपल्या आजोबांच्या कुशीत जाऊन शिरला. 

त्याचवेळी आम्ही वेदांतच्या आजीशी देखील बोललो. "आम्ही मोठ्या कष्टाने संसार उभा केला. पण, चक्रीवादळ आलं आणि सारं घेऊन गेला. गावच्या नागरिकांना झाड तोडण्यास मद केली. पण, त्यांना देखील काही मर्यादा येतात. सारं काही गेलं. पण, समाधान एकच आहे ते म्हणजे आमचा नातू यातून बचावला. बाकी काही नको." हे सांगताना आजीचे डोळे देखील पाणवले होते. 

तर, वेदांतच्या आईच्या तोंडून देखील शब्द बाहेर पडत नव्हते. ''मी त्यावेळी घरात होते. वेदांत बाहेर होता. अचानक आम्ही त्याला शोधू लागलो. बाहेर मोठा आवाज झाला म्हणून मी धावत आले. घराचे पत्रे पडत होते. झाड कोसळल्याने घरांच नुकसान झालं होतं. वेदांवरवर देखील पत्रा पडणार तोच बाबांनी त्याला खेचलं. आज बाबा नसते तर काय झालं असतं काय ठावूक? वेदांतला त्यांनी प्रसंगावधान राखत आपला जीव धोक्यात घालत वाचवले. आज काही घडलं असतं तर? अशी प्रतिक्रिया यावेळी वेदांतच्या आईने दिली. तर, वेदांतचे बाबा भालचंद्र कलंबटे यांनी देखील "आज आम्ही सारं काही गमावलंय. आमचा सारा संसार गेला. सारं काही उभं करायला चार ते पाच लाखांचा खर्च आहे. पण, आमचा एकुलता एक मुलगा सुखरुप आहे. लॉकडाऊनमुळे मोठा परिणाम झालाय. यातून सावरताना खूप कष्ट असणार असल्याची प्रतिक्रिया दिली."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram