Cyclone Tauktae : श्रीवर्धन परिसरातील आंबा व्यापारी आणि बागायतदारांचं मोठं नुकसान
तोक्ते चक्रीवादळामुळे श्रीवर्धन परिसरातील आंबा व्यापारी आणि बागायतदार यांचं नुकसान झालं आहे. अजूनही मे महिना संपलेला नाही त्यामुळे अनेक ठिकाणी आंबा अजूनही झाडावर आहे. श्रीवर्धन जवळच्या काळींजे गावातील आंबा व्यापारी निवृत्ती देवकर म्हणाले की, "मागच्या वर्षी आंबा होता पण वाहतूक व्यवस्था नव्हती त्यामुळे आंबा पडून राहिला. यावर्षी आंबा आहे, वाहतूक व्यवस्था देखील आहे परंतु आता या वादळाने फळांचं नुकसान केलं. त्यामुळे विक्री कुठून करणार?" कालपासून अनेक ठिकाणी आंबा गळून पडल्याचं पाहायला मिळत आहे. आंबा बागेचे मालक दिलीप देवकर म्हणाले की, "मागच्या वादळात निम्म्या बागेतील झाडं उन्मळून पडली. यंदा जी काही पाच दहा झाडं बाकी होती त्यातून मला आर्थिक मदत होणार होती. परंतु वादळ आलं आणि झाडावरील आंबा खराब झाला. जवळपास 50 हजार रुपयांचं माझं नुकसान झालं आहे. त्यामुळे अपेक्षा आहे सरकार आम्हाला आर्थिक मदत करेल. मागच्या वेळी प्रत्येकी 35 हजार रुपये मिळणं अपेक्षित होतं परंतु काही जणांना 5 ते 10 हजार रुपये मिळाले. अपेक्षा आहे यंदा तरी सर्व रक्कम मिळेल."