Coronavirus Updates | अमरावती जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अमरावती : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग एकिकडे देशात नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे, तर महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणांपुढे मात्र एक वेगळंच आव्हान उभं राहिलं आहे. राज्यातील काही भागांमध्ये कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. त्यामुळं नियंत्रणात आलेल्या परिस्थितीवर असणारी पकड अशीच ठेवण्यासाठी आता राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक वेगानं कामाला लागल्या आहेत. असं असलं तरीही एका जिल्ह्यात मात्र नाईलाजास्तव संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे.
28 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील अमरावती जिल्ह्यात हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. अमरावती जिल्ह्यात गर्दी टाळण्यासाठी 28 फेब्रुवारी पर्यंत संचारबंदीचे आदेश दिले गेले असून, या आदेशांअंतर्गत सर्व दुकानं आणि सेवा मात्र पूर्ववत सुरू राहणार आहेत. केवळ गर्दीला प्रतिबंध घालण्यासाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
1 फेब्रुवारीपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले. पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र जमू नये. विद्यालय, महाविद्यालय - कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवावेत असं सांगत धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्याचा निर्णय अमरावती जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.