Controversial Statement : धमकी म्हणजेच राहुल गांधींच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार, सामनातून हल्लाबोल

Continues below advertisement

Controversial Statement : धमकी म्हणजेच राहुल गांधींच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार, सामनातून हल्लाबोल

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याची भाषा भाजपचे पुढारी व त्यांच्या गोतावळ्यातील लोक करतात. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा त्यावर बोलायला तयार नाहीत. म्हणजे या हिंसक वक्तव्यांना व गांधींवरील हल्ल्याचे कारस्थान रचणाऱ्यांना मोदी-शहांचा छुपा पाठिंबा आहे असे समजायचे काय?  महाराष्ट्रात राहुल गांधींवर हिंसक हल्ल्याची भाषा होते. गांधींवर हल्ला करणाऱ्यांना इनाम देण्याची घोषणा करणाऱ्यांना गृहमंत्री फडणवीस संरक्षण देत असतील तर या राज्यात विरोधी पक्ष सुरक्षित नाही. मोदी यांनी विष पेरले, ते उगवले आहे!  लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत भाजप व त्यांच्या गोतावळ्याने केलेली वक्तव्ये भयंकर आहेत. नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत जे विष पेरले ते कसे उगवले आहे याचे चित्र मागच्या काही दिवसांत दिसले. आरक्षणासंदर्भात गांधी यांनी परदेशात केलेले विधान भाजपवाल्यांनी देशात मोडून तोडून समोर आणले. गांधी हे देशातील आरक्षण संपवायला निघाले आहेत व आम्ही ते होऊ देणार नाही, असे गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले. 'फेक नरेटिव्ह' निर्माण करण्याच्या कारखान्याचे मालक मोदी, शहा व फडणवीस असे लोक आहेत व त्यांनी गांधी हे आरक्षणविरोधी असल्याचा प्रचार सुरू केला. इथपर्यंत सर्व ठीक, पण आता भाजप व त्यांच्या लोकांनी गांधी यांच्या संदर्भात हिंसक वक्तव्ये करायला सुरुवात केली. राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस देऊ, अशी भाषा मिंधे गटाच्या एका आमदाराने केली, तर भाजपचे एक 'बोंडे' खासदार सांगतात, जीभ कापण्याची गरज नाही. जिभेला चटके देऊ. त्याच वेळी दिल्लीतील भाजपचे एक आमदार धमकी देतात की, राहुल यांची अवस्था त्यांच्या आजी इंदिरा गांधींसारखी करू. ही धमकी म्हणजे गांधी यांच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार आहे. इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती व राहुल गांधी यांनाही त्याच मार्गाने जावे लागेल, असे भाजपचे आमदार सांगतात. त्याच वेळी केंद्रातले रेल्वे राज्यमंत्री, उत्तर प्रदेश सरकारमधील एक मंत्री राहुल गांधींबाबत  अभद्र आणि हिंसक वक्तव्ये  करतात. हे चित्र बरे नाही. भाजपचे मानसिक संतुलन कोलमडले आहे व वरपासून खालच्या स्तरापर्यंत या कोलमडलेल्या मनाची प्रचीती लोकांना रोज येत आहे. राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे नेते आहेत व त्यांच्या पक्षाचे शंभर खासदार निवडून आले आहेत. सरकारच्या खोट्या व चुकीच्या गोष्टींची गय न करता त्यांनी मोदी सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. विरोधी पक्षनेत्याचे हे कर्तव्यच आहे व भारतीय संविधानाने त्यांना हा अधिकार बहाल केला आहे. विरोधी पक्षनेते संविधानाने दिलेल्या अधिकाराचे पालन करीत आहेत. त्यामुळे चिडलेला भाजप त्यांची जीभ कापणार असेल तर या देशात इदी अमिनशाही सुरू आहे हे मान्य करावे लागेल. गांधी यांनी आरक्षणाबाबत मत मांडले, ते चुकीच्या पद्धतीने समोर आणले गेले. त्याचा प्रतिवाद न करता जीभ कापण्याची व चटका देण्याची भाषा करायची हा कोणता कायदा? रशियात पुतीन यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना ठार केले किंवा तुरुंगात टाकले. युगांडात इदी अमिनदेखील विरोधकांशी याच पद्धतीने वागत होता. भारतातील भाजप व त्यांच्या कोंडाळ्यानेही आता त्याच पद्धतीने वागायचे ठरवले आहे. प्रश्न राहुल गांधींचा नसून देशातील लोकशाही परंपरेचा आहे. देशातील आरक्षण संपवायचा अधिकार कुणा एका व्यक्तीला व त्याच्या पक्षाला नाही. दलित, शोषित, भटके, विमुक्त, आदिवासी, ओबीसी व आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना स्वाभिमानाने जगण्यासाठी भारतीय  संविधानाने आरक्षण  दिले आहे. ते कुणाच्या बोलण्याने व भाषणाने कसे रद्द होणार? पण भाजपवाले खोटे बोलण्यात व फेक नरेटिव्ह निर्माण करण्यात वस्ताद आहेत. त्यांना जातीय दंगली घडवायच्या आहेत व त्यासाठी ते संधी शोधत आहेत. मुख्य म्हणजे राहुल गांधी यांच्यासह मोदींना विरोध करणाऱ्या सर्वच नेत्यांना भाजपने वधस्तंभावर चढवायचे ठरवले आहे. त्यासाठीच ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर करून खोटी प्रकरणे तयार केली गेली व विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आले, पण त्या तुरुंगाचे भय आता उरलेले नाही. मोदी यांचेही भय संपले आहे. कारण या लोकांनी सर्वच बाबतीत अतिरेक केला आहे आणि आता ते हिंसक बोलण्याचा अतिरेक ते करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मोदी यांचा तसा पराभवच केला. तरीही त्यांचे डोके भलत्याच दिशेने चालत आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याची भाषा भाजपचे पुढारी व त्यांच्या गोतावळ्यातील लोक करतात. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा त्यावर बोलायला तयार नाहीत. म्हणजे या हिंसक वक्तव्यांना व गांधींवरील हल्ल्याचे कारस्थान रचणाऱ्यांना मोदी-शहांचा छुपा पाठिंबा आहे असे समजायचे काय? महाराष्ट्रात राहुल गांधींवर हिंसक हल्ल्याची भाषा होते. गांधींवर हल्ला करणाऱ्यांना इनाम देण्याची घोषणा करणाऱ्यांना गृहमंत्री फडणवीस संरक्षण देत असतील तर या राज्यात विरोधी पक्ष सुरक्षित नाही. मोदी यांनी विष पेरले, ते उगवले आहे!

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram