Yashomati Thakur | सरकार स्थिर चालवायचं असेल तर काँग्रेस श्रेष्ठींवर बोलणं टाळा : यशोमती ठाकूर
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे. "सरकार स्थिर राहावं असे वाटत असेल तर काँग्रेस नेतृत्त्वावर बोलणं टाळावं," असं ट्वीट काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि राज्याच्या महिला-बालकल्याण मंत्री योशमती ठाकूर यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्वीट म्हणजे सूचक इशाराच समजला जात आहे.
यशोमती ठाकूर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "आघाडीमधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आले आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्ष म्हणून मी आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटते असेल तर काँग्रेसच्या नेतृत्त्वावर टीका-टिप्पणी करणं टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं. काँग्रेसचं नेतृत्त्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे."