Tanmay Fadnavis | फडणवीसांच्या पुतण्याकडून लस घेतल्याचा फोटो आधी शेअर मग डिलीट, काँग्रेसकडून टीका
मुंबई : देशात सध्या 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस दिली जात आहे. तर येत्या 1 मेपासून देशातील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहे. परंतु विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तरुण पुतण्याने त्याआधीच कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याने काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसने ट्वीट करुन "फडणवीस यांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?" असा प्रश्न उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र काँग्रेसने सोमवारी (19 एप्रिल) संध्याकाळी आपल्या ट्विटर हॅण्डलवर नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लस घेणाऱ्या तन्मयचा फोटो शेअर केला आहे.
तन्मयचा फोटो शेअर करत काँग्रेसचे सवाल काँग्रेसने ट्वीट करत लिहिलं आहे की, "45 वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे. असं असताना फडणवीसांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का!"
"तन्मय फडणवीस 45 वर्षांपेक्षा मोठा आहे का? फ्रण्टलाईन वर्कर आहे का? आरोग्य कर्मचारी आहे का? जर नसेल तर त्याला लस दिलीच कशी? भाजपकडे रेमडेसिवीरप्रमाणे लसींचा सुद्धा गुप्त साठा आहे का?" असे प्रश्न काँग्रेसने विचारले आहेत