1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लस, केंद्र सरकारचा निर्णय; सर्व स्तरांतून निर्णयाचं स्वागत
नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत केंद्र सरकारने लसीकरणासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व जण लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत आज हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉक्टर, टास्क फोर्स आणि औषध निर्मिती कंपन्यांसोबत बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जास्तीत जास्त भारतीयांना कमीत कमी वेळेत लस दिली जावी यासाठी सरकार मागील एक वर्षापासून प्रयत्न करत आहे. देशात लसीकरण वेगाने सुरु आहे, पुढेही ही गती कायम राहणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
सर्वांना कोरोनाची लस दिली जावी अशी मागणी देशभरातून केली जात आहे. लसीकरणाचा हा तिसरा टप्पा असणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील नागरिकांचा समावेश होता. तर दुसऱ्या टप्यात 45 वर्षांवरील सर्वांच लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.