Rajeev Satav Corona Negative | काँग्रेस खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात
पुणे : काँग्रेसचे नेते तसंच खासदार राजीव सातव कोरोनामुक्त झाले आहेत. 19 दिवसांनी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या त्यांच्यावर सामान्य वॉर्डमध्ये देखरेखीखाली उपचार करण्यात येत आहेत. लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचं कळतं.
कोविड-19 पॉझिटिव्ह आल्यानंतर खासदार राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर ते आता व्हेंटिलेटर शिवाय देखील श्वास घेऊ शकतात, असंही डॉक्टरांचं म्हणण आहे. येत्या काही दिवसांमधे राजीव सातव यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल असंही डॉक्टर म्हणाले.
19 एप्रिलला राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली. 22 तारखेला त्यांची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आली. 23 एप्रिलला ते पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मात्र 25 तारखेला त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. तर काही तक्रारींमुळे 28 तारखेला त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयामधील डॉक्टरांची टीम पुण्याला रवाना झाली होती.
राजीव सातव आता कोरोनामुक्त झाले असून लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.